Saturday, September 14, 2024

पारिजात

सकाळी खिडकीशी बसून मी बाहेर बघतो तेव्हा बाहेरच्या पारिजातकाच्या झाडाखाली सडा असतो. आणि मी बघत असतानाही अधून मधून एखादे फूल अलगद खाली येते. ते इतके सावकाश आणि हलकेच खाली येते की जणू काही एखादी मुलगी paragliding करून हसत हसत मस्त मजेत जमिनीवर उतरत आहे. ही फुले अशी हळुवार तरंगत जातात ते किती सुंदर दिसते. निसर्गाने काय काय करून ठेवले आहे आणि रोज किती सुंदर गोष्टी तो रोजच्या रोज आपल्यासमोर ठेवत असतो... मग ती पारिजतका ची फुले असो, पानांवरून पडणारे दवबिंदू असो नाहीतर सकाळची सूर्योदयाची रंगपंचमी असो. मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण च. माणूस उगा कुठल्या त्या फेसबुक, इंस्टा वगैरेच्या आभासी दुनियेत वेळ घालवून स्वतः चे अस्तित्व हरवून बसतो. इथे त्याच्या आजूबाजूला सतत...(आजच्या भाषेत बोलायचे तर 24X7) निसर्गाची धमाल चालू असते. त्यात सहभागी होऊन आपणही त्या निसर्गाच्या किमयेत हरवून जावे, हरखून जावे. ते सोडून आपण आपले व्याप वाढवतो आणि त्यासाठी पुन्हा एकातून एक असे नवीन त्रास निर्माण करतो. निर्मिती म्हणजे ही जो निसर्ग रोजच्या रोज नवीन करतो ती. अश्या वेळी माणूस किती खुजा वाटतो निसर्गा समोर.


मला नेहमी अशी पारिजातकाची फुले पडताना असे वाटते की बाहेर जाऊन त्या झाडाखाली आडवे व्हावे आणि तो पडणारा सडा अंगावर घ्यावा. पण तिथे मुंग्या, मुंगळे आणि इतर अगम्य कीटक यांचे एक वेगळेच विश्व कार्यरत असते. माझ्यासारखे आडवे होऊन फुलांचा आस्वाद घ्यावा एवढी कुठे त्यांना फुरसद. ते सर्व भयंकर गडबडीत असतात. इकडून तिकडे तुरुतुरु पळत असतात. त्यांचा ह्या रूटीन मध्ये अचानक हा डोंगराएवढा मानवी देह आला तर फारच गोंधळ. अश्या आगंतुक पाहुण्यावर ही मंडळी थेट हल्ला चढवतात. त्यामुळे मला इच्छा असूनही तो सडा अंगावर घेऊन अनुभवता येत नाही.


तरीपण मी चप्पल घालून बाहेर जातो आणि त्या झाडाखाली उभा राहतो. आजूबाजूच्या मुंग्यांचा अंदाज घेत थोडेफार झाड अलगत हलवतो. काही ओली फुले डोक्यावर , खांद्यावर विसावतात. छान वाटते. मस्त सुगंध दरवळतो. मग मी डोळे मिटतो आणि ते सर्व मनात साठवतो....त्या फुलांचा स्पर्श, तो सुगंध, सकाळची वेळ, मंद वारा.. सारे काही आतमध्ये शोषून घेतो.


हे एवढे सारे मग मला पूर्ण दिवसभर पुरते. दिवसात कधीही काहीही राग, चिडचिड, वैताग झालाच तर मी हे सकाळचे पारिजातकाच्या झाडाखाली उभे राहणे आठवतो आणि क्षणार्धात माझ्या सर्व मनात तो पारिजात व्यापून जातो. हे सारे विलक्षण असते. जादूसारखे असते.


- डॉ प्रवीण कुलकर्णी