सर्व सामान्यपणे डॉक्टरकडे जायचे म्हटले ,की बऱ्याच लोकांना थोडे टेंशन येते. काहींना धडधड, पोटात गोळा वगैरे येतो. त्यामागचे कारण असे की काहीतरी निघाले म्हणजे ? किंवा डॉक्टरनी टेस्ट सांगितल्या म्हणजे? आणि बरेचदा टेस्ट करण्यास डॉक्टर सांगतातच. मग त्या लॅब मध्ये जावा, टोचून घ्या, मग १-२ दिवसानी रिपोर्ट. तोपर्यंत टेंशन राहतेच. या सगळ्या भानगडी करण्यापेक्षा न गेलेले बरे. पण तेही घराच्या औषधाने बरे झाले तर ठीक नाहीतर काय करणार? गुगलला विचारले तर तो डॉक्टरांनीही लाजवेल असे एकापेक्षा एक डेंजर आजाराची लिस्टच देतो. अशी सगळी गोची होते. काही वेळा आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीने प्रश्न सुटतात. पण कधी ना कधी मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरची पायरी चढावी लागतेच. या सर्व टेंशनचे मुख्य कारण असते की मेडिकल सायन्स बद्दलची समाजात असलेली ज्ञानाची , माहितीची उणीव. त्यात मेडिकल शास्त्र हे निव्वळ शास्त्र नसून त्यात बरेचसे "आर्ट" आहे. आणि हे आर्ट म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रत्येक रुग्ण हा वेगळा आणि युनिक आयडेंटिटी/जेनेटिक मेकअपचा असल्याने त्याला योग्य अशी एकमेव अशी विशिष्ट उपचार पद्धती आणि औषधे वापरणे. हीच ती कला / "आर्ट" या शास्त्रात फार महत्त्वाची आहे. त्यामुळे धोपट पद्धतीने ट्रीटमेंट योग्य ठरतं नाही. चांगली शिकली सवरलेली माणसे सुद्धा मेडिकल सायन्स बाबत खूप अनभिज्ञ असतात. इंटरनेटवर विश्वास ठेवावा असे काही फारसे सापडत नाही. अश्या वेळी एखादा authentic, किंवा ज्याला विश्वासार्ह, अगदी खात्रीचा म्हणावा असा चांगला डॉक्टर जर असेल तर मग गोष्टी सोप्या होतील असे वाटते.
Friday, April 29, 2022
चांगला डॉक्टर कसा ओळखावा???
Sunday, April 24, 2022
नाटक परीक्षण : सारखं काहीतरी होतंय
प्रशांत दामले म्हणलं की की मनमुराद हास्य आणि धमाल नाटक हे समीकरण नाट्य रसिकांच्या डोक्यात फिट्ट बसले आहे. नाही म्हणायला प्रशांत दामलेनी अधून मधून प्रत्येक नाटकात २-३ भावनिक आणि गंभीर प्रसंग उत्तमरीत्या सादर केले आहेत ( उदा - चार दिवस प्रेमाचे मधील शेवटचा प्रसंग). पण अश्या प्रसंगातून दामले आपली गंभीर अभिनयाची हौस भागवून घेतात असे वाटते. तसे ते आपल्या गायनाची हौस ही प्रत्येक नाटकात सादर करतातच. प्रशांत दामले यांचे विनोदी नाटक हे त्यांच्या गाण्याबरोबरच असते हेही त्यांच्या फॅन लोकांनी स्वीकारले आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अशोक सराफ आणि नाटक क्षेत्रातील दामले हे दोघेही उत्तम अभिनेते असूनही त्यांना विनोदी भूमिकांमध्येच मायबाप प्रेक्षकांकडून स्वीकारले जाते आणि इतर भूमिकांमध्ये नाकारले जाते हे त्या त्या अभिनेत्याचे दुर्दैव की मराठी रसिकांच्या आवडीचा खुजेपणा म्हणावा कुणास ठाऊक.
Sunday, April 17, 2022
पुनश्च हरिओम
मी ४-५ वर्षापूर्वी साधारणतः २०१८ साली मी पहिला ब्लॉग लिहला होता. नंतर आणखीन एक बहुदा "पाडला". त्यानंतर मध्ये मी हे ब्लॉग प्रकरण विसरूनच गेलो होतो. माझे लेखन चालू होते, पण ते मी माझ्यासाठी लिहीत होतो. म्हणजे कसं आहे नं, की आपल्या डोक्यात बरेच काही विचार असतात आणि त्यातून आपला थोडाफार गोंधळ उडालेला असतो. अश्या वेळी ते विचार डोक्यातून काढून कागदावर उतरवले की मग ते जास्त स्पष्ट होतात आणि डोकेही शांत होते. तुम्ही हॅरी पॉटर ची पुस्तके किंवा पिक्चर बघितले असतील तर त्यात त्याचे मुख्याध्यापक डंबलडोर हे अश्याच प्रकारे त्यांच्या डोक्यात त्रास देणारे विचार किंवा प्रसंग किंवा घडलेल्या घटना, या सर्व जादूच्या छडीने डोक्यातून काढून ठेवत असतात. आणि मग सवडीने ते पुन्हा बघत असतात. मी फक्त ते कागदावर लिहून काढतो. आता त्यातील काही मी आता सोशल मीडिया वर शेयर करावे असे वाटले म्हणून हा पुन्हा एकदा ब्लॉगचा प्रपंच. खरंतर सोशल मीडिया ही गोष्ट जितकी आपल्या आयुष्यात कमी, तितके आयुष्य शांत आणि सरळ असते अश्या जुन्या विचारसरणीचा मी आहे. पण, आज परिस्थिती अशी आहे की जर तुम्ही जर सोशल मीडिया वर उपलब्ध नसाल, ॲक्टिव नसाल, तर मग आजच्या नवीन पिढीच्या दृष्टीने तुम्ही अस्तित्वात नाही. आणि मग तुम्ही एकटे पडत जाण्याचा धोका असतो. म्हणजे सोशल मीडिया हे 'धरलं तर चावतयं आणि सोडलं तर पळतयं' असा प्रकार आहे. असो. तर मग पुन्हा मी ब्लॉग लिहायला सुरू करतोय. बघू कसे काय जमले ते.... नाहीतर मग गाजराची पुंगी- वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली....😉