आजचे डॉक्टर पूर्वीच्या डॉक्टरांपेक्षा वाईट आहेत का?
हल्लीचे डॉक्टर लुटतात, पैसे काढतात, विनाकारण तपासण्या करतात, एकमेकांना कमिशन देतात वगैरे अश्या अनेक गोष्टी चवीने बोलल्या जातात. आणि मुक्तपणे सर्व डॉक्टर लोकांना शिव्या घातल्या जातात. पूर्वी डॉक्टर लोक सज्जन होते, प्रामाणिक होते असा सूर असतो. खरंतर, वाईट प्रवृत्ती सगळ्याच क्षेत्रात आहेत. आणि मेडिकल क्षेत्र त्याला अपवाद नाही. पण, इतर लोकांपेक्षा म्हणजे पोलिस, वकील, राजकारणी वगैरेपेक्षा डॉक्टरांवर टीका ही समाजात, वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर बऱ्याच जास्त असतात. याचे कारण असे की पूर्वी डॉक्टर आणि पेशंट यांच्यात एक विश्वासाचे नाते होते. पण ८६-८७ साली जेव्हा consumer protection act ( ग्राहक संरक्षण कायदा ) हा डॉक्टरांना लागू झाला, तेव्हापासून पेशंट हा "ग्राहक" आणि डॉक्टर हा " सर्व्हिस provider" ( सेवा देणारा) असा कायदा झाला. त्यामुळे डॉक्टर लोक थोडेसे घाबरले, सावध झाले. कारण त्यांच्या कडून एखादी छोटीशी चूक (human error) जरी झाली तरी त्याबद्दल त्यांना शिक्षा , दंड वगैरे होऊ शकतो हे कळले. त्यात इंटरनेट मुळे पेशंट जागरूक झाले आणि डॉक्टर्सना प्रश्न विचारू लागले. यात डॉक्टर - पेशंट हे विश्वासाचे नाते संपून गेले.
काही कोर्ट केसेस मध्ये हलगर्जीपणा केलेल्या डॉक्टरांना शिक्षा झाली. काही ठिकाणी रुग्णांना न्यायही मिळाला. यामध्ये, कोर्ट हे केवळ पुरावा बघून निर्णय देत असल्याने, कागदोपत्री काय लिहिले आहे याला जास्त महत्त्व आले. भले एखाद्या डॉक्टरने पेशंट नीट बघू दे किंवा नाही, त्या रुग्णाच्या केस पेपरवर जर सर्व व्यवस्थित डॉक्टरने लिहिले असेल आणि खाली सही केली असेल, तर कोर्ट त्यानुसार, डॉक्टरने पेशंट व्यवस्थित तपासला आहे असा निकाल देते. तेच जर, पेशंट नीट बघितलं असेल, व्यवस्थित योग्य उपचार केले असतील पण, केस पेपरवर जुजबी लिहिले असेल, आणि समजा असा पेशंट योग्य उपचार करूनही दगावला, आणि नातेवाईक कोर्टात गेले तर केस पेपर बघून कोर्ट त्या डॉक्टरला दोषी ठरवते. यामुळे कागदी पुराव्याला महत्त्व आले.
त्यामुळे प्रत्येक डॉक्टर सावधपणे वागू लागला. आता एक साधे उदाहरण बघा. खोकल्याचा पेशंट आला की पूर्वी डॉक्टर एखादी खोकल्याची बाटली आणि ४ गोळ्या द्यायचे. आज त्या पेशंटचा x ray काढला जातो. का तर डॉक्टरला कमिशन म्हणून नाही तर उद्या पेशंटला टि.बी. निघाला तर हा पेशंट माझी तक्रार करेल की या डॉक्टरने माझा टी.बी. नीट बघितला नाही वगैरे. म्हणून x ray. बरं, आता x ray रिपोर्ट कसा असतो? अगदी स्वच्छ नॉर्मल x ray असला तरी, तो रिपोर्ट करणारा radiologist पुन्हा सावधपणे रिपोर्ट देतो की - सगळं ठीक आहे x ray मध्ये, पण तरीसुद्धा टी.बी. असू शकतो. थोड्या ब्लड टेस्ट करून बघा. आणि छातीचा स्कॅन केलेला बरा. झालं.. आता असा रिपोर्ट आल्यावर ज्याने x ray साठी पाठवले, त्या डॉक्टरला पुन्हा ब्लड टेस्ट स्कॅन वगैरे करावे लागते. स्कॅन रिपोर्ट करणारा सावधपणे म्हणतो - स्कॅन नॉर्मल आहे पण bronchoscopy करा. असे एकातून एक टेस्ट होत जातात आणि पेशंट चक्रात अडकल्यासारखा टेस्ट मागून टेस्ट करत राहतो. अश्या खोकल्याच्या पेशंटसाठी एखादा जनरल प्रॅक्टीस करणारा डॉक्टर साधे औषधे देऊन बरा करू शकतो. पण त्यासाठी पेशंटचा डॉक्टरवर आणि डॉक्टरचा पेशंटवर विश्वास हवा. आज तो नाही, म्हणून हे सारे होते.
यात पुन्हा, डॉक्टर व्यवसाय हा एक इंडस्ट्री व्यवसाय गृहीत धरून सर्व टॅक्सेस आणि अटी या व्यवसायाला असाव्यात असा सरकारने नियम केल्याने, सर्व डॉक्टर्स , अगदी एखादे छोटेसे क्लिनिक किंवा लॅब असली तरी इंडस्ट्री सारखे फायर प्रोटेक्शन, employer agreement, waste disposal, registration वगैरे असे असंख्य फॉर्म्स आणि परवानग्या घ्यायला लागतात. तिथे प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये त्यासाठी बराच "खर्च" होतो. या सर्वाची कॉस्ट मग महागड्या टेस्ट, स्कॅन्स यामधून होते. सरकारने खूप 'क्वालिटी कंट्रोल' सिस्टिम्स मेडिकल प्रोफेशनमध्ये आवश्यक केल्या आहेत. त्या गरजेच्या आणि योग्यच आहेत. पण, त्याची वार्षिक मेंटेनन्स कॉस्ट खूप असते. अश्या खूप गोष्टी मेडिकल प्रोफेशन मध्ये गेल्या ३० वर्षात आल्या आहेत. यामुळे कॉस्ट वाढतच चालली आहे. कट प्रॅक्टीस, incentives या गोष्टी पूर्वी सुद्धा होत्या. आता काळानुसार त्याचे प्रमाण आणि व्याप्ती वाढली आहे. आणि stent, औषधे, फार्मा लॉबी ( औषध कंपन्या) या केवळ मेडिकल प्रोफेशन नाही तर सरकार बरोबर सुद्धा डील करत असतात, तेथेही देवाण घेवाण चालू असतेच. फार्मा कंपनीकडून कोणतीही गिफ्ट डॉक्टर्सना देऊ नये असा कायदा आहे. तरीपण काही फरक पडला का? साधे चौकात वाहतुकीचे नियम कोण पाळत नाही आणि चुकून सापडले तर चिरीमिरी पोलिसाला देऊन सुटका होते. असे असताना फार्मा लॉबी काय असल्या कायद्याला पाळणार? प्रत्येक कायद्यातून लूप होल्स बघून गोष्टी केल्या जातात. असा हा मेडिकल व्यवसाय. जसे राजकीय पुढारी, पोलिस यंत्रणा, सरकारी कार्यालये हे व्यवसाय वाईट प्रवृत्तीने बिघडलें आहेत हे समाजाने स्वीकारली आहेत. तसाच हा एक व्यवसाय म्हणून जर समाजाने याकडे बघितले तर मग आजचे डॉक्टर फार वाईट आहेत असे वाटणार नाही. आणि डॉक्टर हाही एक माणूस आहे आणि स्खलनशील आहे , तोही इतरांसारखे चुकू शकतो हे ध्यानात ठेवले तर मग एखाद्या डॉक्टरांच्या चुकीमुळे साऱ्या डॉक्टरांकडे संशयाने बघावे लागणार नाही. काही अपवाद वगळता, अजूनही बऱ्याच प्रमाणात मेडीकल क्षेत्र हे इतर व्यवसाय/क्षेत्रे यांच्यामानाने बरेच प्रामाणिक आणि कार्यक्षम आहे हे नक्की. त्यामुळे, रुग्णांनी, त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर मनापासून विश्वास ठेवला तर आजचे डॉक्टरही पूर्वीच्या डॉक्टरांसारखेच गुणी आहेत हे लक्षात येईल.
कोण डॉक्टर मुद्दामहून रुग्णाला चुकीची औषधे देईल आणि मारेल?? पण , आज अश्या आरोपांच्या केसेस कोर्टात हजारोंनी चालू आहेत. काही अपवाद वगळता या केसेस म्हणजे समाजाचा आणि पेशंटचा डॉक्टर लोकांवरचा संपलेला विश्वास हेच आहे. "आधी कोंबडे का आधी अंडे" या नियमाने समाज म्हणतो, आधी डॉक्टर नीट वागू देत, वैद्यकीय सेवा योग्य देऊ देत, मग आम्ही डॉक्टरवर विश्वास ठेवतो. दुर्दैवाने, या चक्रातून शेवटी रुग्ण आणि त्याचे कुटुंब त्रास सहन करत राहते. आणि कोर्ट केसेस ची संख्या वाढतच राहते.
- डॉ प्रवीण कुलकर्णी.
