केसरी टूर्स तर्फे एप्रिल २०२३ मध्ये आम्ही अमृतसर, डलहौसी, धरमशाला अश्या ३ ठिकाणी ट्रीपसाठी गेलो होतो. मुंबईहून ते अमृतसर असे प्लेन होते. प्लेन सकाळी लवकर होते. त्यादिवशी गृहमंत्री मुंबईत असल्याने ट्रॅफिक जॅम असणार, म्हणून आम्ही आदल्या दिवशीच मुंबईत मुक्काम करायचे ठरवले. टर्मिनल १ जवळ असलेल्या एअरक्राफ्ट इंटरनॅशनल या हॉटेल मध्ये एक रात्र राहिलो, ३५००/- भाडे, छान हॉटेल, १० मिनिटात चालत टर्मिनल १ मध्ये माणूस पोचतो. गरज असल्यास अवश्य राहावे असे ठिकाण. आमचे गो फर्स्टचे विमान होते. (आता सध्या ती एअरलाईन्स बंदच पडली आहे). पण त्यावेळी सुद्धा सगळ्या गो फर्स्ट फ्लाइट्स उशिरा होत्या. (खरतर "गो लास्ट" म्हणावे अश्या...)
आमची फ्लाईट नंतर लेट होऊन साडेदहाची झाली. त्यादरम्यान गेट १ वर आम्ही क्यू मध्ये उभारलो. आम्हाला गो फर्स्टच्या बसमध्ये चढवले आणि तिकडे विमानाकडे नेऊ लागले. १०-१५ मिनिटे झाली तरी बस आपली विमानतळावर चाललीच आहे. काही कळेना. आजूबाजूला इंडिगो, स्पाइस जेट वगैरे विमाने दिसत होती. मध्येच भंगारात निघालेले किंग फिशर सुध्दा दिसले. पण आमची बस अजून थांबायची काही चिन्हे दिसेनात. मला शंका आली की गो फर्स्ट आम्हाला बसनेच अमृतसरला नेते की काय ? काही वेळाने तर विमानतळाचे कुंपण दिसू लागले, मग मला खात्रीच पटली की हा बस ड्रायव्हर आता कुंपण तोडून डायरेक्ट नॅशनल हायवेवर बस नेणार......पण नाही. मध्येच एक गो फर्स्टचे विमान दिसले. मग हुश्श झाले. विमानात आम्ही आत जाऊन बसलो. गंमत म्हणजे, चालू झाल्यावर ते विमान सुद्धा बराच वेळ विमानतळावर फिरले. पण, बसच्या अनुभवामुळे आम्हाला हे लोक जरा "मंद" आहेत हे समजले होते. त्यामुळे पायलट आम्हाला रस्त्याने न नेता विमान उडवूनच अमृतसरला पोचवेल याची खात्री होती. आमच्या तिकिटावर एक "मील" फ्री होते. अनपेक्षितरित्या हे चक्क चांगले होते चवीला. नाहीतर, विमानातील खाद्यपदार्थ सगळे थंड आणि बेचवच असतात. दुसरे आश्चर्य म्हणजे हवाई सुंदरी या बऱ्याचशा माणसाळलेल्या होत्या. म्हणजे इतर विमान कंपन्यांच्या असतात तश्या प्लास्टिक चेहऱ्याच्या आणि कोरड्या भाषेत बोलणाऱ्या, वावरणाऱ्या हवाई सुंदरी नव्हत्या. ह्या मुली प्रवाशांशी आपुलकीने बोलत होत्या. हे जरा वेगळेच होते.
विमानप्रवास संपल्यावर आम्ही अमृतसरमध्ये जेवण घेऊन डलहौसी कडे रवाना झालो.आमच्या बरोबरच वीणा वर्ल्डची सुद्धा याच भागाची सहल करणारी बस होती. वाटेल चहा कॉफी ब्रेक साठी दोन्ही बस एकाच ठिकाणी थांबत. त्यावेळी केसरी आणि वीणा या २ टूर कंपनीच्या टूर ऑपरेटर स्टाफ मधील मैत्री जाणवली. भले,आपल्याला असे वाटते, की या कंपन्यामध्ये जोरदार स्पर्धा असणार, पण तसे काही नाही. अतिशय मस्त गप्पा मारत ही स्टाफ मंडळी चहा पित होती. दुपारी ३ वाजता अमृतसरहून निघून, रात्री साडे आठ- नऊच्या सुमारास आम्ही डलहौसीच्या हॉटेलमध्ये पोचलो. दिवसभरच्या प्रवासाने दमून गेल्याने जेऊन झोपलो.
सकाळी उठून "साईट सीइंग"(उर्फ स्थलदर्शन) सुरू केले. एक स्मारक, खज्जियार आणि लेक असा प्लॅन होता. भगतसिंगांच्या काकांचे स्मारक दाखवले. तेही हुतात्मा होते. पण एक छोटा पुतळा आणि कट्टा यापलीकडे तिथे बघण्यासारखे काही नाही. तिथे जाताना, गाडीतून क्षितिजावर मस्त पांढऱ्या शुभ्र हिमालयाच्या पर्वत रांगा दिसतात. खूप छान दृश्य आहे ते. तिथे रस्त्यात काही फोटोग्राफर असतात. तुमचा "मागच्या हिमालयाच्या बॅक राऊंड " घेऊन फोटो काढतो असे सांगून फोटो काढतात.४०-१०० रुपये वाया. काहीही नीट फोटो येत नाहीत. त्यापेक्षा स्वतः मोबाईलचे फोटो बरे येतात. ( हा माझ्या नोकिया 7 प्लस मधून काढलेला. फोटोग्राफ ने काढलेल्या फोटोत पोट्रेट फोटो सारखी फक्त माणसेच दिसतात,ही अशी पार्श्वभूमी येत नाही )
तिथून खज्जीयार येथे गेलो. याला "मिनी स्वित्झर्लंड" म्हणतात कारण तिथल्या निसर्गाचे विहंगम दृश्य. इथे खाण्यापिण्याची चंगळ आहे. फोटोग्राफर आहेत. पॅराग्लायडिंग आहे. वॉकिंग ट्रॅक आहे. निवांत बसायचे असेल तर सावलीत खूप बाक आहेत. इथे खूप शांत आहे.

खज्जीयार येथे या मस्त निसर्गासमोर बसल्यावर शांत वाटते. इथे १ तास फक्त बसले तरी आयुष्य ५-६ वर्षांनी वाढेल असे वाटते. हिरवळ, त्यावर फिरणारी पाखरे, तलाव, मागे हिरवीगार झाडी, निळे आकाश, पांढरे ढग, थंड हलकासा वारा...हे सगळे सकाळी ११ वाजता आपण बघत आहोत आणि अनुभव घेत आहोत ह्या कल्पनेने फारच छान वाटते. पुढे काही काम नाही आणि असेच अजून तासभर इथेच फिरायचे आहे ह्या विचाराने खूप बरे वाटते. जवळच नवीन चालू झालेले आयटीसीचे हॉटेल होते. तिथे जेवलो. अतिशय मस्त चवदार जेवण. गरमागरम भजी थंडीत खायला छान वाटली. तिथून लेककडे गेलो. हिल स्टेशन म्हणजे तलाव हवाच. आणि त्यात बोटिंग आलेच या नियमाने केसरीने आम्हाला तलावात फिरवले. प्रत्येक हिल स्टेशनला एक तलाव आणि त्यात पर्यटकांना फिरवणे ही टुरिस्ट कंपन्यांची " fill in the blacks" (गाळलेल्या जागा भरा) अशी एक ॲक्टीविटी असावी. लाईफ जॅकेट घालून बोटीतून फिरणे. एक अत्यंत नॉन स्पेसिफिक ॲक्टिविटी. स्किप करण्यासारखी. भर दुपारच्या उन्हात मस्त चांगले भरपेट जेवल्यानंतर एसी रूममध्ये मस्त ताणून झोप घ्यावी हा खरंतर बेस्ट प्लॅन झाला असता . पण दुपारी ३-४ भर उन्हात तलावात फिरणे नशिबात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी डलहौसी मधून निघालो ९ वाजता. वाटेत जेवलो.आणि ६ वाजता संध्याकाळी धरमशाला मध्ये पोचलो. भयंकर कंटाळवाणा प्रवास. बसमध्ये जुनी हिंदी गाणी लावलेली, त्यामुळे बरे झाले. त्यात केसरी टूर्सने आधीच आपल्या मोबाईलमध्ये गाणी, व्हिडिओ वगैरे लोड करून ठेवा कारण खूप रोड जर्नी आहे असे सांगितले होते म्हणून सर्वजण तसे मानसिकरीत्या तयार होतेच. संध्याकाळी धरमशाला मध्ये पोचलो. इकडे सगळ्या हॉटेलमध्ये बुद्ध दिसतात. फोटो.. मूर्ती...खूपच प्रभाव आहे इकडे.

धरमशाला हे मोठे शहर आहे. एअरपोर्ट, क्रिकेट स्टेडियम आणि मोठ्या ब्रँड्सची हॉटेल्स. शहरातून कुठूनही बर्फाच्छादित शिखरे दिसतात. इथे सकाळी आम्ही स्वयंभू शंकराचे मंदिर आणि त्यामागे असलेला छोटा धबधबा पाहिला.खरंतर छोटी नदी वाहते आहे. इथे शंकराने अर्जुनला गांडिव धनुष्य दिले अशी आख्यायिका आहे. नंतर चिन्मय तपोवन आश्रमात गेलो. एक शांत सुंदर आध्यात्मिक निसर्गरम्य परिसर. तिथून जेवणानंतर रोप वे मधून मॅक्लेडगंज साठी गेलो. तिथे दलाई लामा यांचे स्तूप (मॉनेस्ट्री)पाहिली. तिथे बुद्धाची खूप सुंदर मूर्ती आहे. धरमशाला हे बऱ्यापैकी थंड ठिकाण आहे.त्यामुळे स्वेटर, शाल,मफलर,कानटोपी, वगैरे बरोबर असावे.चांगला "डेडीकेटेड" कॅमेरा असावा. कारण मोबाईल कॅमेरा तेवढे चांगले फोटो घेत नाही. मॅक्लेडगंजचे मार्केट फारसे काही खास वाटले नाही. इथे शॉपिंग करावे असा केसरीने सल्ला दिला होता. संध्याकाळी २ तास तिकडे शॉपिंग साठी ठेवले होते. नंतर भागसू नाग मंदिर पाहिले, पण पुढे धबधबा पाहिला नाही. बाकी कांग्रा व्हॅली, किल्ला, दाल लेक या गोष्टी केसरीच्या प्लॅनमध्ये नव्हत्या. का कोण जाणे. नंतर तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी (ट्रीपच्या पाचवा दिवस) बसने अमृतसरला गेलो. संध्याकाळी गुरू गोविन्द गड येथे लेसर व लाईट शो पाहिला. अमृतसरमध्ये तसे बरेच स्पॉट्स आहेत बघायला. अमृतसर म्हणले की जालियनवाला बाग आलीच.

खरंतर जालियवाला बाग ही शंभरएक वर्षापूर्वी घडलेली घटना, टु बी करेक्ट १०४ वर्षे. त्याचे आजच्या स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षानी कितपत महत्व किंवा जाणीव आजच्या पिढीला आहे/असावे असे मला वाटत होते. पण इथे एंट्रेन्स पासून प्रत्येक गोष्ट अगदी विचारपूर्वक घडवली आहे. आत २-३ गॅलरी/मुझियम आहेत. त्यात पंजाबचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान हे फोटो, फिल्म्स द्वारे दाखवले आहे. विजयस्तंभ आहे. विहीर आहे. ग्रॅनाईटचे मोठे स्तंभ आणि त्यावर वेगवेगळ्या हुतात्म्यांचे कोट्स लिहलेले आहेत. बाग तशी खूप मोठ्ठी आहे आणि सतत पार्श्वभूमीवर वगैरे सारखी देशभक्तीची गाणी सतत चालू असतात. एकूण १ तासाचे दर्शन आहे. पण खरोखरच खूप छान बघण्यासारखे आहे.
मग, आम्ही सुवर्ण मंदिर बघायला गेलो.

इथे "व्हीआयपी" पास वगैरे भानगड नाही. सर्वांनी रांगेत उभे रहायचे. सातच्या आसपास मंदिराचे लायटिंग सुरू करतात. ते खूप छान दिसते.सुवर्णमंदिर परिसरात प्रचंड शॉपिंगसाठी दुकाने आहेत. खूप सुंदर ड्रेस मटेरियल मिळतात. फुलकारी वर्क असलेले ड्रेस मटेरियल असते. पण केसरी टूर मॅनेजरच्या म्हणण्यानुसार इथे बऱ्यापैकी फसवणूक होते. हे मटेरियल दिसत छान असले तरी खराब होते लगेच. त्यापेक्षा मुख्य शहरातील शास्त्री मार्केट परिसरात फुलकारी ड्रेस मटेरिअल चांगले व टिकाऊ असते म्हणे. मंदिरात जायच्याआधी आम्हाला पंजाबी लस्सी पाजण्यात आली. त्याचे कारण, आत रांगेत तासभर उभे रहायचे असते. मंदिराच्या बाजूला लंगर आहे. २४ तास भोजन. केव्हाही जावा, रात्री अपरात्री जेवण चालू असते. आम्ही ६ च्या आसपास गेलो तर जेवण होतेच पण चहा चपाती नाश्ता चालू होता. आम्ही चहा घेतला. सर्व जागा, भांडी वगैरे अगदी स्वच्छ होते. एकूण मंदिराचा परिसर स्वच्छ होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात २४ तास अन्नदान इतर भारतात मी कोठेही पाहिले नाही , कदाचित असेलही. दिल्लीमध्ये जेव्हा शेतकऱ्यांचे एक वर्ष आंदोलन / साखळी उपोषण चालले होते तिथे असेच हे लंगर चालू होते वर्षभर. या लंगर मधील सेवा, तिथले कर्मचारी, तिथे मिळणारे अर्थ सहाय्य .. सगळे अचंबित करणारे होते.
तिथे आम्ही अमृतसरी रिक्षात बसलो.
मंदिरापाशी बस, गाड्या जायला अवघड आहे. रिक्षा करावी लागते. त्यात कमीत कमी ८ जण बसवतात. पुढे २, मागे ३ , ड्रायव्हर आणि पॅसेंजर च्या मध्ये आडवी सिट असते - तिथे ३ आणि मागे डिकीत २. एकूण १४०० ते १६०० रुपये घेतात, पर हेड २०० रुपये. यानंतर आमचा स्पॉट होता तो वाघा/अट्टारी बॉर्डर. तिथे रोज संध्याकाळी परेड असते. दोन्ही बाजूची गेट उघडतात. दोन्ही बाजूचे सैनिक परेड करतात. स्पिकरवर मोठ्या आवाजात देशभक्तीपर गाणी चालू असतात. ते कमांडर आपल्याला घोषणा द्यायला लावतात. प्रेक्षकातील बायकांना खाली बोलावून तिरंगा झेंडा हातात धरून चालायची संधी देतात. नंतर त्यांना गाण्यांवर नाचायला सुद्धा सांगतात. धमाल चालू असते. एकूण ३ तासाचा राष्ट्रभक्तीचा कार्यक्रम असतो. वीर-झारा या चित्रपटाचा क्लायमॅक्स या ठिकाणी चित्रित केला होता.
शेवटी, आम्ही सद्दा पिंड येथे गेलो. हे एक मुद्दामहून तयार केलेले पंजाबी खेडे आहे. पंजाबी संस्कृतीची ओळख व्हावी या हेतूने ते बनवले आहे. (जयपूर येथे असेच चोखी दानी खेडे आहे.). मक्के की रोटी, सरसो का साग, पंजाबी लस्सी असे इथे मिळते. आणखी बरेच काही आहे.गेम्स, पंजाबी खाटा, जादूचे प्रयोग, डान्सिंग शो . आरामात अर्धा दिवस निघून जातो. सात दिवसानी शेवटी आमची ट्रिप संपली. ७ दिवस एकत्र असल्याने सर्वांचा ग्रुप जमला होता. त्यामुळे जाताना ग्रुप फोटोसेशन झाले, एकमेकांचे मोबाईल नंबर देणे - घेणे झाले. येताना आम्ही पुन्हा गो फर्स्टनेच मुंबईला आलो. येताना चक्क फ्लाईट वेळेवर सुटली आणि पोचली. कारण दुसऱ्याच दिवशी पेपरमध्ये वाचले की गो फर्स्टच्या सर्व फ्लाइट्स रद्द झाल्या, कंपनीने दिवाळखोळी जाहीर केली वगैरे. असो.
केसरीतर्फे आमची ही पहिली टूर. खरंतर वयाच्या पन्नाशीपर्यंत आम्ही कायमच स्वतः टूर प्लॅन करायचो. ऑनलाईन बुकींगमुळे आता ते सोपंही आहे. पण, ही ट्रीप आम्ही केसरीने केली कारण कंटाळा. कुठे जायचे, भारतात की भारताबाहेर ही चर्चा. मग हॉटेल कुठले, काय बघायचं, फ्लाईट बुकींग, टॅक्सी बुकींग.. अश्या अनेक चर्चा होतात. तेवढा वेळही यावर्षी नव्हता. त्यामुळे फारसा विचार न करता केसरीची टूर बुक केली होती. केसरी टूर्सकडे आमचे थोडे पैसेही यायचे होते. (पूर्वी कोविड काळात बुक केलेली आणि नंतर कॅन्सल केलेली टूर). आणखी एक म्हणजे, मला असे वाटायचे की या टूर कंपन्या आपल्या पर्यटकांना भराभर सगळे स्पॉट्स दाखवतात आणि दमवून टाकतात. पण असे काही निदान केसरी टूर्सबाबत आम्हाला वाटले नाही. निवांत, मजेत प्रत्येक स्पॉटसाठी भरपूर वेळ देऊन आमची ट्रीप झाली. दीड तास नाष्टासाठी, दोन तास जेवणासाठी, संध्याकाळी साडे पाच - सहाच्या आसपास हॉटेलवर परत आणि चहाआणि भजी/ बिस्कीट घेऊन सर्व साईट सीईंग समाप्त. थेट साडे आठ नऊला जेवण. आम्हीच आपले आपले संध्याकाळी हॉटेलवर गेल्यावर चहा घेऊन थोडफार वॉक करून यायचो. आमच्या बरोबर ग्रुपमध्ये ४-५ वेळा केसरीने गेलेले बरेच जण होते. १०-१५ वेळा केसरीने परदेश प्रवास केलेले सुद्धा होते. एकूण बऱ्यापैकी प्रवासी हे केसरी टूर्स बाबत समाधानी/आनंदी होते . एकूण अनुभव चांगला होता. एखाद्याला फारसा विचार आणि कष्ट न घेता जर ट्रीप करायची असेल तर केसरीने जायला हरकत नाही हा माझा सल्ला.