सकाळी उठल्यावर किती पक्ष्यांचा चिवचिवाट चालू आहे. इतका की एकावेळी अनेक जण बोलत आहेत. एखाद्या छोट्या लग्नाच्या हॉलमध्ये लोक खूप बोलत असताना एक गजबजाट असतो तसे वाटले. पण तो गजबजाट कानाला त्रासदायक वाटतो. पण हा चिवचिवाट ऐकायला गोड आहे. मध्येच दूरवर भारद्वाज पक्षाचे घुमणे चालू आहे. बाजूला कोकिळेच्या कूहू कुहू वाजत आहे. निसर्गाचा हा पहाटे पहाटे सुरू असलेला ऑर्केस्ट्रा ऐकला की असे वाटते की या सर्व सृष्टीचा निर्माता येत आहे त्या सूर्यनारायण राजाच्या स्वागताचे हेच संगीत आहे. या संगीताच्या पार्श्वभूमीवर अंधार जाऊन हळूहळू प्रकाश येत आहे. हे सारे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. आता हळूहळू पक्ष्यांचे आवाज कमी होऊ लागले आहेत. अधून मधूनच एखाद्या पक्ष्याची लकेर ऐकू येते. मग कोकिळा, भारद्वाज यांचा पखरव, पुन्हा थोडा मंद चिवचिवाट. हे जणू चर्चेचे प्रचंड गुऱ्हाळ झाल्यानंतर आता एकमत होऊन शेवटचा मीटिंगचा सारांश आणि निर्णय सांगितल्यासारखे वाटते. अजून थोड्या वेळाने प्रकाश अजून आल्यावर तर एकदम सारे शांत, जणू आता सर्व मंडळी आपापल्या नेहमीच्या पोटापाण्याच्या कामाला निघून गेली असावी. उगाच मध्येच एक चिमणी कुठेतरी थोडी चिवचिव करते, मधून कोकिळा आहेच. या सर्व बहुदा घरचे काम करत बसणाऱ्या गृहिणी असाव्यात ज्या कुठे झाड सोडून जात नसाव्यात आणि आसपासच भटकत, संसारासाठी, घरट्याची मरम्मत करता करता चार शब्द बोलत असाव्यात. गल्लीतल्या वर्षानुवर्षांच्या कुत्र्यांच्या शत्रुत्वाला मग तोंड फुटले. एकामागोमाग एक भुंकू लागले. किती वेळ अगदी धाप लागेपर्यंत ही कुत्री न थांबता काय कारणाने भुंकत राहतात हे एक न उलगडलेले निसर्गाचे कोडे आहे. तरी सकाळी थोडा वेळच ही भूंकाभुंकी चालते. सकाळच्या पक्ष्यांच्या मधुर संगीतानंतर हे भुंकणे अगदीच विसंगत वाटते. पण पक्षिमंडळीना बहुदा याची सवय असावी. कारण या कुत्र्यांच्या भुंकण्याने क्षणभरच चिवचिव थांबते आणि पुन्हा चालू होते. बहुदा ही कुत्री काय कधीच सुधारणार नाहीत असा विचार करून पक्षी आपला नेहमीचा चिवचिवाट चालूच ठेवतात. आता आंब्याच्या झाडावरून खारींची चुक् चुक् अश्या एकमेकांना हाका मारणे चालू झाले. ५-६ खारींचे एक कुटुंबच राहते आहे आमच्या आंब्याच्या झाडावर. त्या खारींच्या आवाजातच चिवचिव चालूच आहे. पक्षी लोकांत बहुदा खार या जमातीकडे ' उडू न शकणारी झाडावरची एक प्रजाती ' अश्या करुण भावनेने बघत असावेत. कारण खारींच्या हाकांनी पक्षी विश्वाच्या आवाजात काहीही फरक पडत नाही. त्यांच्या गप्पा चालूच आहेत.
या अश्या वातावरणात मी हळूहळू उठतो. हे असे हळूहळू उठणे हे सुद्धा फार छान आहे. जणू काही दिवसात एक एक पाऊल टाकत शांतपणे मी त्याला सामोरं जात आहे. काही गडबड नाही पळापळी नाही. सूर्य उगवतो तसा मी रोज उगवतो असे मी गमतीने म्हणत असतो. माझे हे असे सावकाश उठून खिडकीत पक्षांचे आवाज ऐकणे हा रोजचा सोहळा असतो. आता मी पुन्हा कान लावून ऐकतो आहे की कुणी आहे का पक्षी अजून बडबड करणारा. पण आता सारे शांत झाले आहे. सगळीच पक्षी मंडळी आता कामाला लागलेली दिसतात. नाईलाजाने, मलाही आता उठून माझ्या कामासाठी गेले पाहिजे. नाराज होऊन मी उठतो आणि आवरायला घेतो.
समाप्त.
(This is fiction work, not reality)
No comments:
Post a Comment