" वाळवी" चित्रपट परीक्षण.
" वाळवी " अश्या एखाद्या नकोशा वाटणाऱ्या किड्याबद्दल कुणी पिक्चर काढलाय किंवा काढत आहे असे मी ऐकले असते तर डोक्याला हातचं लावला असता. जगात इतकी चांगली नावे असताना हे दळभद्री लक्षण का सुचलं कुणाला असे वाटले असते. पण परेश मोकाशी नावाचा माणूस असा चित्रपट तयार करतो तेव्हा मात्र आपल्याला दाखल घ्यावीच लागते. परेश मोकाशी यांचे आधीचे चित्रपट आठवले तर तुमच्या लक्षात येईल. हरिश्चंद्रची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि व चि सौ कां. तिन्ही मध्ये खूप मोठी अशी गोष्ट नाही पण भरपूर प्रसंग निर्मिती आणि त्यातून उलगडत जाणारी गोष्ट. तिन्ही चित्रपट चांगले होते. म्हणून मी हा चौथा बघायला गेलो.
यूट्यूब वर ट्रेलर आहे तो जर तुम्ही बघितला असेल तर गोष्ट काय आहे हे कळले असेलच. ते तसेही फारसे महत्त्वाचे नाही. मोकाशी गोष्ट कशी खुलवून सांगतात ते बघायचे. आधीच्या तीन चित्रपटासारखेच येथे एक कथा आहे. एका खुनाचा प्लॅन. आणि त्यातून घडणारे कथानक. स्वप्नील जोशी सुबोध भावे अनिता दाते शिवानी सुर्वे अशी ४ मुख्य पात्र ( आणि खरतर तेवढीच पात्र आहेत). साधारणपणे २४ तासात घडणारी गोष्ट. पण सुरवातीपासून शेवटपर्यंत जे काही पडद्यावर चालू असते ते निव्वळ भन्नाट. एखादा माणूस असं काहीतरी करू शकतो आणि त्याला वाळवी असलं विचित्र किड्याचे नाव देऊन तो चित्रपट थिएटर मध्ये लावू शकतो हेच मानलं पाहिजे.
चित्रपटाची अगदी पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत मांडणी इतकी व्यवस्थित आणि सुसंगत आहे की पहिल्या भागात घडत जाणाऱ्या गोष्टीला मध्यंतरात जेव्हा ब्रेक येतो तेव्हा चित्रपटातल्या पात्रांवरोबर प्रेक्षक ही बुचकळ्यात पडतो. आणि आता पुढे काय ? असा प्रश्न पडतो. मध्यंतरानंतर चित्रपट जो सुरू होती आणि एकामागोमाग एक अश्या घटना घडत जातात की मती गुंग होते. आणि शेवटी एका अनपेक्षित शेवट होऊन अचानक पिक्चर संपतो. वेगाने घडणारे कथानक असे थांबते की प्रेक्षक अवाक होतात.
सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय झाला आहे. कुठेही मेलोड्रामा नाही. जास्त कलाकाराचा मेक अप नाही. गाणी नाहीत. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे तर कसलेले अभिनेते आहेतच, पण तुलनेने ज्युनिअर आणि नवीन असलेल्या शिवानी सूर्वेनी ही डेंटिस्ट च्या भूमिकेत झकास काम केले आहे. अनिता दातेना वाव खूप कमी आहे. संकलन, पार्श्व संगीत, कथा व इतर तांत्रिक बाजू झी ची निर्मिती असल्याने उत्तम आहेतच.
एकूण काय, ही "वाळवी " अनुभवण्यास नक्की जा. तुम्हाला परेश मोकशीचे आधीचे तिन्ही चित्रपट आवडले असतील तर हा तुम्ही नक्की एन्जॉय कराल. एकदम छान चित्रपट.
No comments:
Post a Comment