मी का लिहितो ?
मी बरेच काही लिहीत असतो. प्रत्येक लिखाण मी सर्वांना वाचायला देतो असे नाही. काही लेख मी कुणालाच दाखवत नाही. ( काही फक्त एखाद्या वक्तीस किंवा फक्त एका ग्रुपला " शेयर " करतो). किंबहुना खूपसे माझे लिखाण हे मी सोडून कुणीही बघितलेले नाही. असे का? कारण , मी जेव्हा काहीतरी लिहतो, तेव्हा त्याचा मूळ उद्देश हा माझ्या डोक्यात, मनात जे काही चालू असते ते बाहेर काढणे महत्त्वाचे असते. मग काही वेळा ते केवळ मनातील गोष्टींचा नीट मेळ घालण्यासाठी असते तर काही वेळा फार त्रास देणाऱ्या विचारांना बाहेर फेकून देण्यासाठी असते. कधी हे गद्य रुपात येते तर कधी त्याची कविता होते. ते माझ्या हातात नसते. हे मनातून, डोक्यातून आतून असे बाहेर येते ते, चांगलेच असेल हे काही निश्चित नसते. बरेचदा ते सामान्य किंवा वाईट सुद्धा असू शकते. आणि हे लेखन कुणाला आवडेल किंवा नाही याने मला काहीच फरक पडत नाही. मी लिहतो कारण मला लिहीत असताना आनंद मिळतो आणि ते पूर्ण झाल्यावर कुठेतरी आतमध्ये मला एक छान समाधान असते. बरेचदा असे होते की एखादी गोष्ट किंवा प्रसंग आपल्याला खूप भावतो, मग आपण त्याबद्दल काहीतरी लिहतो. ते खूप छान झाले आहे लेखन, असे वाटून मग आपण ते ' शेयर ' करतो इतरांबरोबर. पण त्यांना ते तेवढे आवडत नाही. काहीवेळा तर सोशल मीडिया वर काही रिस्पॉन्सही येत नाही. अश्या वेळी मन खट्टू होते. आपल्याला वाटते की काही खास जमत नाही लिखाण वगैरे. पण, मूलतः आपण का लिहितो हे प्रत्येकाने स्वतः शी ठरवले पाहिजे. जर मी फक्त माझ्या आनंदासाठी, समाधानासाठी लिहीत असेन तर मग कुणाला ते आवडते का नावडते हे काही महत्त्वाचे नाही. हे लिहणे म्हणजे खरंतर एक स्वतः शी केलेला संवाद असतो. त्यातून आपल्याला काहीतरी स्वतः विषयी नवीन सापडत असते. काहीवेळा लिखाणातून नाती नीट समजतात, गोंधळ दूर होतात. कधी अडचणींवर मार्ग सापडतो तर कधी पुढे काय करायचे आहे ते समजते. त्यामुळे आपले लेखन हा आपला स्वतः चा शोध घेण्याचा एक प्रवास असतो हे प्रत्येक लेखकाने समजून घेतले पाहिजे. एकदा हे सर्व केवळ आपल्या आनंदासाठी, समाधानासाठी आहे हे कळले, की मग हा प्रवास खूप सुंदर आणि मस्त होऊन जातो. आणि म्हणून मी लिहित असतो.
No comments:
Post a Comment