Sunday, April 24, 2022

नाटक परीक्षण : सारखं काहीतरी होतंय

 प्रशांत दामले म्हणलं की की मनमुराद हास्य आणि धमाल नाटक हे समीकरण नाट्य रसिकांच्या डोक्यात फिट्ट बसले आहे. नाही म्हणायला प्रशांत दामलेनी अधून मधून प्रत्येक नाटकात २-३ भावनिक आणि गंभीर प्रसंग उत्तमरीत्या सादर केले आहेत ( उदा - चार दिवस प्रेमाचे मधील शेवटचा प्रसंग). पण अश्या प्रसंगातून दामले आपली गंभीर अभिनयाची हौस भागवून घेतात असे वाटते. तसे ते आपल्या गायनाची हौस ही प्रत्येक नाटकात सादर करतातच. प्रशांत दामले यांचे विनोदी नाटक हे त्यांच्या गाण्याबरोबरच असते हेही त्यांच्या फॅन लोकांनी स्वीकारले आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अशोक सराफ आणि नाटक क्षेत्रातील दामले हे दोघेही उत्तम अभिनेते असूनही त्यांना विनोदी भूमिकांमध्येच मायबाप प्रेक्षकांकडून स्वीकारले जाते आणि इतर भूमिकांमध्ये नाकारले जाते हे त्या त्या अभिनेत्याचे दुर्दैव की मराठी रसिकांच्या आवडीचा खुजेपणा म्हणावा कुणास ठाऊक.

 असो. तर फोन वरून भरपूर मार्केटिंग करून "सारखं काहीतरी .." हे नाटक गाजत वाजत रंगभूमीवर ताजे आले आहे. त्यात भरीस भर म्हणून सुप्रसिद्ध वर्षा उसगावकर याही आहेत नाटकात. त्यामुळे बऱ्याच उत्साहाने रसिक प्रेक्षक या नाटकात गर्दी करत आहेत. तसा मीही या नाटकासाठी bookmyshow वरून खूप आधी तिकिटे रिझर्व्ह केली. प्रत्यक्षात थिएटर ९०-९५% भरले होते. ( हाऊस फुल्ल नव्हते).
 प्रयोग  छान झाला, उत्तम रंगला. दामलेंची २ गाणीही सुरेख झाली. थोडे फार वर्षा उसगावकर सुद्धा गायल्या. नेहमीप्रमाणे २-३ गंभीर प्रसंगही दामलेंनी उत्तम केले. त्यांचे ठरलेले रंगमंचावरील प्रासंगिक विनोदही झकास. वर्षा उसगावकर यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि इमेज ला शोभेशी अशी फटकळ आणि उद्धट भूमिका देऊन दिग्दर्शन केलेल्या संकर्षण याने अचूक तीर मारला आहे. उसगावकर यांनी अगदी टेचात ही भूमिका केली आहे. बाकी इतर कलाकार आपापल्या भूमिका व्यवस्थीत निभावतात. विक्रांत यांना कर्कश उच्च स्वर लावून बोलण्यात सुरवातीस विनोद होतो खरा, पण नंतर ते त्रासदायक. तसेच पूर्णिमा यांचे. अतिशयोक्ती मुळे होणारा विनोद हा निदान दामलेंच्या नाटकात अपेक्षित नव्हता. २-३ वेळा ठीक आहे , पण संपूर्ण नाटकात त्याच पध्दतीने विनोद करत राहणे हे या दोन्ही भूमिकांचा कमकुवतपणा दाखवते.  प्रशांत दामले यांची मुलगी झालेल्या सिद्धी घैसास याही ठीक. कधीकधी ओव्हर ॲक्टिंग/रिॲक्टिंग होते पण अजून तरुण असल्याने सुधारणेला वाव आहे. असे हे सर्व सामान्य विनोदी नाटक. काही जास्त नाही, काही कमी नाही आणि काही नवे नाही. 
 दामले यांनी एक लग्नाची दुसरी गोष्ट नाटक केले तेव्हा असे वाटले की आता प्रौढ भूमिकाच्या आपल्या दुसऱ्या इनिंग मध्ये दामले त्यांच्या फॅन लोकांना काहितरी नविन वेगळ्या धाटणीच्या धमाल भूमिकांची मेजवानी देतील. पण या नाटकाने त्याबाबत घोर निराशा केली. इतकी वर्षे त्याच प्रकारच्या भूमिका आणि हमखास हसा घेणारे त्याचे खास ठेवणीतले विनोद या पलीकडे या नाटकात फारसे काही नाही. वर्षा उसगावकर यांचे जोरात रंगभूमीवर पुनरागमन हे ही या नाटकाने अधोरेखित केले. बाकी संगीत, कथा, नेपथ्य, दिग्दर्शन वगैरे या गोष्टी हाडाच्या समीक्षक लोकांनी सांगाव्यात. त्या नेहमीप्रमाणेच दामले यांच्या विनोदी नाटकात असतात तश्याच. मी सामान्य रसिक प्रेक्षक असल्याने अशा क्लिष्ट बाबत न बोललेले बरे. शेवटी, प्रशांत दामले यांचे फॅन असाल तर या नाटकास अवश्य जा. सगळा नेहमीचा मसाला आहेच. पण एक रसिक म्हणून मला स्वतः ला तरी निदान या नाटकाने निराशा केली हे खरे. 

No comments:

Post a Comment