Friday, April 29, 2022

चांगला डॉक्टर कसा ओळखावा???

 सर्व सामान्यपणे डॉक्टरकडे जायचे म्हटले ,की बऱ्याच लोकांना थोडे टेंशन येते. काहींना धडधड, पोटात गोळा वगैरे येतो. त्यामागचे कारण असे की काहीतरी निघाले म्हणजे ? किंवा डॉक्टरनी टेस्ट सांगितल्या म्हणजे? आणि बरेचदा टेस्ट करण्यास डॉक्टर सांगतातच. मग त्या लॅब मध्ये जावा, टोचून घ्या, मग १-२ दिवसानी रिपोर्ट. तोपर्यंत टेंशन राहतेच. या सगळ्या भानगडी करण्यापेक्षा न गेलेले बरे. पण तेही घराच्या औषधाने बरे झाले तर ठीक नाहीतर काय करणार? गुगलला विचारले तर तो डॉक्टरांनीही लाजवेल असे एकापेक्षा एक डेंजर आजाराची लिस्टच देतो. अशी सगळी गोची होते. काही वेळा आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीने प्रश्न सुटतात. पण कधी ना कधी मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरची पायरी चढावी लागतेच. या सर्व टेंशनचे मुख्य कारण असते की मेडिकल सायन्स बद्दलची समाजात असलेली ज्ञानाची , माहितीची उणीव. त्यात मेडिकल शास्त्र हे निव्वळ शास्त्र नसून त्यात बरेचसे "आर्ट" आहे. आणि हे आर्ट म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रत्येक रुग्ण हा वेगळा आणि युनिक आयडेंटिटी/जेनेटिक मेकअपचा असल्याने त्याला योग्य अशी एकमेव अशी विशिष्ट उपचार पद्धती आणि औषधे वापरणे. हीच ती कला / "आर्ट"  या शास्त्रात फार महत्त्वाची आहे. त्यामुळे धोपट पद्धतीने ट्रीटमेंट योग्य ठरतं नाही. चांगली शिकली सवरलेली माणसे सुद्धा मेडिकल सायन्स बाबत खूप अनभिज्ञ असतात. इंटरनेटवर विश्वास ठेवावा असे काही फारसे सापडत नाही. अश्या वेळी एखादा authentic, किंवा ज्याला विश्वासार्ह, अगदी खात्रीचा म्हणावा असा  चांगला डॉक्टर जर असेल तर  मग गोष्टी सोप्या होतील असे वाटते. 


पूर्वी सर्वसाधरणपणे, १०० विद्यार्थी जर मेडिकल कॉलेज मध्ये पहिल्या वर्षी जॉईन झाले तर त्यातून ३०-३५ जण पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे, मग ते एम डी असो नाहीतर एम एस असो. त्यातील १५-२० जण पुढे आणखी कॉर्डियोकॉजी, नेफरोलॉजी वगैरे असे विशिष्ट विषयाची पदवी घ्यायचे. आता जो डॉ. एमबीबीएस आहे त्यापेक्षा एमडी जास्त शिकलेला, आणि जो डॉ. एमबीबीएस + एम डी+ डी एम्  शिकलेला तो एमडी डॉक्टर  पेक्षा जास्त शिकलेला या गणीतानुसार पेशंट व त्याचे नातेवाईक विचार करतात. जास्त शिकलेला वकील, इंजिनिअर किंवा प्रोफेसर हा जास्त चांगला वकील/इंजिनिअर/शिक्षक असेलच असे नाही. त्याचप्रमाणे जास्त शिकलेला डॉक्टर हा चांगला डॉक्टर असेलच असे नाही. पण, हल्ली छातीत दुखू लागले की जा हार्ट स्पेशालिस्टकडे, डोके दुखायला लागले  तर न्युरोलोगिस्टकडे असे चालले आहे. पेशंट स्वतःच थेट कुठल्या डॉ. कडे जायचे हे ठरवतो. यात होते असे की जास्त शिकलेला डॉ. म्हणजे जास्त फी, जास्त तपासण्या, महागडी औषधे हे सारे याबरोबरच येते. आपल्या घराजवळच असलेला एमबीबीएस डॉक्टरपेक्षा या स्पेशालिस्टकडे जाणे हे हल्ली खूप कॉमन झाले आहे. बरेचदा अश्यावेळी रुग्णाच्या पदरी निराशा येते. बरे वाटत नाही आणि खर्च ही खूप होतो. पेशंट आणि त्याचे नातेवाईक यांच्या हे लक्षातच येत नाही की चांगला डॉ म्हणजे ज्याच्या कडे जास्त गर्दी किंवा जास्त शिकलेला किंवा मोठं हॉस्पिटल असलेला असे काही नसते. बरेचदा, पेशंट एका डॉक्टरकडे जातात. २-३ वेळा जाऊनही गुण आला नाही तर दुसऱ्या, तिसऱ्या असे डॉक्टर बदलत राहतात. आणि मग शेवटी जिथे गुण येतो, बरे वाटते अश्या कडे कायमचे टिकतात. 
खरंतर, कुठल्याही माणसाला काही त्रास, आजार सुरू झाला तर आधी घराजवळच जनरल प्रॅक्टीस करणारा डॉ, त्यानंतर त्याच्याने बरे नाही वाटले तर एमडी आणि एमडी कडूनही काही आजारात फरक पडेना तर मग स्पेशालिस्ट गाठावा अशी एक प्रकारची साखळी केली पाहिजे. पण थेट स्पेशालिस्टकडे गेला तर विनाकारण खर्च होतो. माशी मारायला बंदूक झाडली अशी तऱ्हा होते. शिक्षणावर  डॉक्टर चांगला किंवा वाईट हे ठरतं नाही. एखादा एमबीबीएससुद्धा एखाद्या स्पेशालिस्टपेक्षा चांगला डॉक्टर असू शकतो हे रुग्णांनी ध्यानात ठेवले पाहिजे. त्यात सध्या वैद्यकीय शिक्षण हे पूर्वी इतके चांगले राहिले नाही. काही अपवादात्मक कॉलेजेस वगळता बाकी सगळीकडे परिस्थिती बिकट आहे. अश्या अपुऱ्या  शिक्षणातून बाहेर पडलेली मुले ही खरोखरच चांगले डॉक्टर बनतील का? असा प्रश्न आहे. ही , मॉडर्न मेडिसिन ची व्यथा. पण, या सगळ्यातून चांगला डॉक्टर शोधणे आज सर्वसामान्य रुग्णासाठी खूप अवघड झाले आहे. अश्या वेळी माणूस पहिल्यांदा आपल्या ओळखीच्या डॉक्टरकडे जातो. म्हणजे लांबचा नातेवाईक असो किंवा आपल्या मित्र/आप्त यांच्या ओळखीचे डॉ. वगैरे. अर्थात एक पेशंटला बरे वाटले म्हणून सगळ्यांनाच त्या डॉक्टरकडून बरे वाटेल अशी काही खात्री नाही. मग चांगला डॉक्टर कसा शोधायचा?
काही ओळखता येईल अश्या खुणा आहेत. म्हणजे कसं की तुम्ही गेल्यावर डॉक्टर तुमच्याशी कसा बोलतो हे पाहावे. डॉक्टरचा रिसेप्शनिस्ट कसा बोलतो/वागतो हे अजिबात बघू नका कारण ९९ ते १००% वेळा सर्व ठिकाणी डॉक्टरचा रिसेप्शनिस्ट  हा/ही अतिशय उद्धट, चिडलेला/वैतागलेला असतो. तो कधीच कुणाशी चांगले बोलत नाही. त्यामुळे तो कसाही असला तरी डॉक्टर नीट बोलतो का हे बघावे. दुसरं- तो डॉक्टर पेशंटचे बोलणे पूर्ण एकूण घेतो का हे बघावे. ऐकताना त्याचे लक्ष आहे का हे पाहावे.  तिसरे- पेशंट साठी पुरेसा वेळ दिला जातो का हे बघावे. काही ठिकाणी असिस्टंट सगळं ऐकतात आणि मग डॉक्टर पटकन तपासून जातात.  चौथे - डॉक्टर पेशंटला किंवा त्याच्या नातेवाईकांना आजाराविषयी कल्पना देतात का, काय झाले आहे, पुढे काय तपासण्या/ट्रीटमेंट करायची आहे वगैरे ही माहिती दिली जाते का? काहीवेळा फारसे काही न सांगता ह्या तपासण्या करा किंवा ही औषधे घ्या बरे होईल, असे फक्त सांगितले जाते. घेतलेली औषधे ही बरोबर आहेत का आणि ती कशी घ्यायची हे पेशंट समजाऊन सांगितले जाते का ? पुन्हा कधी डॉक्टरांकडे यायचे याची माहिती/अपॉइंटमेंट दिली जाते का?  आणि यातून शेवटी सर्वात महत्त्वाचे आपल्याला बरे वाटते का हे बघावे. केवळ नुसते बरे वाटते म्हणजे तो डॉक्टर चांगला असे नसते. कारण बरेचदा, पेन किलर, स्टीरॉइड्स सारखी औषधे देऊन पेशंटला बरे वाटते, पण मग नंतर  मोठ्या आजाराचे निदान उशिरा होते.  ज्या डॉक्टरला आपण दाखवले तो गरज  भासल्यास इमर्जन्सी ला उपलब्ध आहे का हेही बघावे. तो नसेल तर त्याचा असिस्टंट किंवा निदान फोनवर काँटॅक्ट अशी काही सोय आहे का हे बघावे. तसेच कुठलाही चांगला डॉक्टर त्याच्या पेशंटला उपचार करण्याच्या पद्धतीमध्ये, ज्याला ट्रीटमेंट प्लॅन म्हणतात, त्यामध्ये रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना समाविष्ट करून घेतो. रुग्णाची इच्छा, त्याचा प्रेफरन्स, आर्थिक स्थिती, त्याला काय सोयीस्कर आहे, त्याची मानसिक अवस्था, शैक्षणिक पातळी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ट्रीटमेंट द्यायला हवी.  साधे उदाहरण म्हणजे, एखाद्या टपरीवर चहा विकणाऱ्या माणसाला जर शुगर कंट्रोल साठी इन्सुलिन चालू केले आणि ३ वेळा घे म्हणाले तर त्याला ते शक्य नाही, मग भले ते त्याच्यासाठी कितीही आदर्श उपचार असले तरी. तो इन्सुलिन घेणार नाहीच, पण शांतपणे डॉक्टर बदलणार. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन स्टेप बाय स्टेप एमबीबीएस, एमडी, आणि शेवटी स्पेशालिस्ट अश्या क्रमाने जावे म्हणजे व्यवस्थित निदान होईल आणि खर्चही कमी येईल. हया सर्व गोष्टी एकाच डॉक्टर मध्ये असणे म्हणजे आखूड शिंगी बहुदुधी वगैरे म्हणतात तशी गाय शोधण्यासारखे आहे. पण निदान यातील ५-६ पॉइंट्स तरी असतील तरी तुम्ही बऱ्यापैकी चांगला डॉक्टर गाठला असे म्हणता येईल.  आणि  चांगल्या डॉक्टरकडे गेल्यावर तुमचा आजार कदाचित बरा होईल किंवा नाही, तुम्हाला गुण येईल किंवा नाही, पण निदान तुम्हाला तुमच्या आजाराविषयी नक्की माहिती, काय काय करायचे आहे, पुढे काय होऊ शकते याबाबत तरी निश्चितच योग्य दिशा मिळेल.

No comments:

Post a Comment