मी ४-५ वर्षापूर्वी साधारणतः २०१८ साली मी पहिला ब्लॉग लिहला होता. नंतर आणखीन एक बहुदा "पाडला". त्यानंतर मध्ये मी हे ब्लॉग प्रकरण विसरूनच गेलो होतो. माझे लेखन चालू होते, पण ते मी माझ्यासाठी लिहीत होतो. म्हणजे कसं आहे नं, की आपल्या डोक्यात बरेच काही विचार असतात आणि त्यातून आपला थोडाफार गोंधळ उडालेला असतो. अश्या वेळी ते विचार डोक्यातून काढून कागदावर उतरवले की मग ते जास्त स्पष्ट होतात आणि डोकेही शांत होते. तुम्ही हॅरी पॉटर ची पुस्तके किंवा पिक्चर बघितले असतील तर त्यात त्याचे मुख्याध्यापक डंबलडोर हे अश्याच प्रकारे त्यांच्या डोक्यात त्रास देणारे विचार किंवा प्रसंग किंवा घडलेल्या घटना, या सर्व जादूच्या छडीने डोक्यातून काढून ठेवत असतात. आणि मग सवडीने ते पुन्हा बघत असतात. मी फक्त ते कागदावर लिहून काढतो. आता त्यातील काही मी आता सोशल मीडिया वर शेयर करावे असे वाटले म्हणून हा पुन्हा एकदा ब्लॉगचा प्रपंच. खरंतर सोशल मीडिया ही गोष्ट जितकी आपल्या आयुष्यात कमी, तितके आयुष्य शांत आणि सरळ असते अश्या जुन्या विचारसरणीचा मी आहे. पण, आज परिस्थिती अशी आहे की जर तुम्ही जर सोशल मीडिया वर उपलब्ध नसाल, ॲक्टिव नसाल, तर मग आजच्या नवीन पिढीच्या दृष्टीने तुम्ही अस्तित्वात नाही. आणि मग तुम्ही एकटे पडत जाण्याचा धोका असतो. म्हणजे सोशल मीडिया हे 'धरलं तर चावतयं आणि सोडलं तर पळतयं' असा प्रकार आहे. असो. तर मग पुन्हा मी ब्लॉग लिहायला सुरू करतोय. बघू कसे काय जमले ते.... नाहीतर मग गाजराची पुंगी- वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली....😉
No comments:
Post a Comment